साठाव्या वाढदिवशी लावली साठ रोपे. निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम.
रत्नागिरी
ग्रामसेवक संघटना चिपळूणचे माजी अध्यक्ष व निवृत्त ग्रामविकास अधिकारी रवींद्र मारुती पाटील यांनी आपल्या साठाव्या वर्षी साठ रोपांची लागवड करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. कडवई ग्रामपंचायतीच्या परवानगीने पाटील यांनी उजगावकर वाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले तसेच त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील उचलली आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना सरपंच विशाखा कुवळेकर म्हणाल्या की, पाटील यांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन आपल्या वाढदिवसाला किमान १० झाडे लावली तर पर्यावरणाचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकते. वृक्षारोपण कार्यक्रमाला कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर, माजी सरपंच वसंत उजगावकर,बापू कदम, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी चौधरी, उद्योजक विजय कुवळेकर, डॉ. अमित ताठरे, शांताराम कुंभार, अविनाश गुरव,निलेश कुंभार, रोशन सुर्वे,राकेश सावरटकर, संगमेश्वर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लोटणकर,सचिव पाटील, सदस्य हतपले, शेट्ये, शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.पाटील यांच्या या उपक्रमाची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी त्यांची भेट घेत वृक्षारोपण केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र सुर्वे व त्यांचे कार्यकर्ते होते.पाटील यांच्या संकल्पाचे कडवई पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.