२५ नोव्हेंबर 'मालवणी अभिमान दिवस' म्हणून साजरा होणार......मुंबईत रंगणार पहिला 'मालवणी अभिमान मेळो'
कणकवली
छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस 'मालवणी अभिमान दिवस' म्हणून साजरा करण्याचा संकल्प मुंबईस्थित 'जय थय मालवणी' संस्थेने केला आहे.याच एक भाग म्हणून यंदापासून दरवर्षी 'मालवणी अभिमान मेळो' आयोजित करण्यात येणार असून पहिला वहिला मेळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. या मेळ्याचे यजमान म्हणून आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी जयेंद्र साळगावकर, भाऊ कोरगावकर, रजनीश राणे आणि संजीव शिरसाट उपस्थित होते. आमदार जठार यांच्या हस्ते मेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठार म्हणाले, हा मेळा कोणत्याही एका पक्षाचा नसून प्रत्येक मालवणी माणसाचा मेळा आहे. सिंधुदुर्गातील आणि जिल्ह्याबाहेरील सर्व राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि मालवणी प्रेमींनी यात सहभागी व्हावे.जयेंद्र साळगावकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय मालवणी नेत्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जाणार आहे.रजनीश राणे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
- सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पवित्र माती, पाणी आणि तटबंदीच्या चिऱ्याची पालखी मिरवणूक काढून मेळ्याची सुरुवात होईल.
- सिंधुदुर्गातील ७० कलाकार लोककलांचे सादरीकरण करतील.
- 'सिंधुदुर्ग विकास' या विषयावर चर्चासत्र, कवी गुरु ठाकूर यांची मुलाखत, मालवणी कवी संमेलन होणार आहे.
- दोन विशेष दालने असतील - 'मालवणी रत्ने' दालनात जिल्ह्यातील १३० कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनप्रवास मांडला जाईल, तर 'ह्या बघलास काय ता!' छायाचित्र दालनातून सिंधुदुर्गाचे विविध पैलू उलगडतील.
- एका ज्येष्ठ व्यक्तीला 'जीवनगौरव' तर दोन कर्तृत्ववान व्यक्तींना 'मालवणी अभिमान' पुरस्काराने गौरवण्यात येईल.
- कवी महेश केळुसकर लिखित आणि श्रीकृष्ण सावंत यांनी संगीतबद्ध केलेले 'मालवणी अभिमान गीत' प्रकाशित होईल.
- समारोप मालवणी नाटकाने होणार आहे.
मालवणी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा मेळा ठरणार आहे.
konkansamwad 
