सावंतवाडी तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सावंतवाडी
नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा जयंती महोत्सव बुधवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता ध्वजारोहण, त्रिसरण पंचशील व बुद्ध पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. सकाळी १०.०० वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आयु. महेंद्र मातोंडकर हे “भारतीय संविधान – आमचा प्राण” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुमिता जाधव (सभापती, पंचायत समिती सावंतवाडी) उपस्थित राहणार आहेत.दुपारनंतर नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी भव्य जयंती रॅली, मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८.३० वाजता समूह भीमगीत गायन स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ₹५५००, ₹३५०० व ₹२५०० रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.याचबरोबर महिलांसाठी “पदर रमाईचा” हा मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच युवकांसाठी “रील स्टार स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. रील स्पर्धेसाठीही आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.या जयंती महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
konkansamwad 
