तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करा - उपजिल्हाधिकारी सुकटे

तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करा - उपजिल्हाधिकारी सुकटे

सिंधुदुर्ग


       तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले. तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही ते म्हणाले.तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठित जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक गुरुवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विभागीय तृतीयपंथीय व्यक्ती हक्क संरक्षण मंडळाच्या सह-अध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांनी संबंधित विभागांनी उपलब्ध शासकीय जागांचा शोध घेऊन महसूल विभागाशी समन्वय साधावा आणि नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण व शहरी भागांत वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींची माहिती गोपनीयता राखून संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माहितीच्या आधारे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, जळगावचे सदस्य योगेश पाटील यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व तक्रारींबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठी कार्यशाळा व जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली, त्यावर संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून कार्यशाळा व शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बालाजी चांदोलकर, विशेष अधिकारी तुषार गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.