शैक्षणिक उठावासाठी परुळे बाजार ग्रामसभेत लोकसहभागावर भर

परुळे बाजार
शासनाच्या सूचनेनुसार शैक्षणिक उठावासाठी गावातील शाळा, पालक आणि विद्यार्थी यांना गाव विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी परुळे बाजार ग्रामपंचायतीत शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. प्रणिती आंबड-पालकर यांनी भूषविले. यावेळी उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, सुनाद राऊळ, तन्वी दूधवडकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर, मुख्याध्यापक सौ. प्रविणा दाभोलकर, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दर्शना नानचे, पालकवर्ग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट, सीआरपी तसेच ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत शैक्षणिक ग्रामसभेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. शाळेच्या विकासासाठी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. माजी विद्यार्थी मेळावा यासारखे उपक्रम नियमित घेण्यात यावेत, कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात यावे, अशा विविध सूचना सभेत मांडण्यात आल्या.
शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य अत्यावश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.