वेंगुर्ले पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट करा!.....न. पा. कौन्सिल सभेत नगरसेवकांची मागणी.....मच्छीमार्केट विस्ताराला मान्यता
वेंगुर्ला
वेंगुर्ले न. पा.ची कौन्सिल सभा नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी महाराज सभागृहात झाली. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सार्वजनिक बांधकाम सभापती प्रणय वायंगणकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती गौरी माईणकर, क्रीडा व सांस्कृतिक सभापती सचिन शेटये, महिला व आरोग्य समिती सभापती गौरी मराठे, उपसभापती रिया केरकर, मागस कल्याण सभापती युबराज जाधव, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, सुमन निकम, काजल कुबल, शीतल आंगचेकर, आकांक्षा परब, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, संदेश निकम, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, प्रशांत आपटे आदी उपस्थित होते. शहरासाठी सर्वोत्तम नागरी सुविधा पुरविण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. विकासकामांकडे नगरसेवकांनी जातीनिशी लक्ष द्यावे, सर्व सेवा सुरळीत देण्यासाठीच विषय समिती स्थापन केल्या जातात. प्रत्येक समितीवर सभापती व नगरसेवकांनी समन्वयाने काम पारदर्शकपणे करायला हवे. नगरसेवकांना कल्पना न देता शहरात कामे परस्पर होत असतील तर ते योग्य नाही. प्रशासनाने यापुढे प्रोटोकॉल जपावा. आपत्ती व्यवस्थापन कामात झालेली हयगय आम्ही खपवून घेणार नाही. आपत्ती व्यवस्थापनाचा बंद असलेला नंबर तात्काळ सुरू करा, पर्यायी व्यवस्था करा. प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी अलर्ट झाले पाहिजे, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले. नगरसेवक संदेश निकम यांनी आपत्ती व्यवस्थापनेच्या कामांबाबत सुरू असलेल्या ढिलेपणाबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. नागरिक वारंवार ही झाडे हटविण्यासाठी मागणी करताहेत, पण झाडे का हटविण्यात येत नाहीत, असा सवाल करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वीकृत नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह संदेश निकम, प्रीतम सावंत, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, सुमन निकम, रिया केरकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर आदींनी प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवत आक्रमक पावित्रा घेतला, विकासकामांच्या निपटाऱ्यासाठी पालिकेने अनेक मशिनरी खरेदी केल्यात. कचरा व्यवस्थापनासाठी वाहने खरेदी केलीत. डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीनही खरेदी केल्या. यातील काही मशिनरी व वाहने नादुरुस्त असल्याने धूळखात आहेत. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यांची बिले वेळेत का काढली जात नाहीत, असे प्रश्न करून त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्षपदी पालकमंत्री नीतेश राणेंची निवड झाल्याने या योजनेतून पालिकेला विविध विकासकामांसाठी चांगला निधी मिळू शकतो. या योजनेंतर्गत मच्छीमार्केट विस्तारीकरणाचे काम प्राधान्याने घ्यावे. तसा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नाला जोडणी उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहरातील मुख्य नाल्याला संरक्षण भिंत उभारण्यासाठी ३५ कोटीच्या निधीला मान्यता द्यावी, असाही ठराव सभागृहात सर्वानुमते घेण्यात आला. पालिकेचे अनेक दावे न्यायप्रविष्ठ आहेत. यासाठी नव्याने वकील नेमावा. यासाठी वकिलाला दरमहा २५ हजार व प्रत्येक तारखेसाठी १००० रु. व शहराबाहेरील दाव्यांसाठी प्रवासखर्च म्हणून ५०० रु. मानधन देण्यास सर्व नगरसेवकांची अनुमती घेण्यात आली. शहर सुशोभिकणासाठी वेंगुर्ले साकव पूल व आडीपुलावर व्हर्टिकल गार्डन उभारले होते. मात्र, यातील अनेक कुंड्यामधील झाडे कुपोषित झाली आहेत. या झाडांची देखभाल व काळजी घेण्याच्या सक्त सूचना नगरसेवकांनी प्रशासनाला केल्या. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमणावर झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या तक्रारी येण्यापूर्वी डास निर्मूलन कामाला प्रारंभ करावा, नादुरुस्त फॉगिंग मशीन दुरुस्त करून घ्याव्यात व नुसताच डिझेलचा धूर सोडण्यापेक्षा डासांचा नायनाट होईल व जनतेच्या आरोग्याला त्रास होणार नाही याचा विचार करून योग्य त्या कीटकनाशकाचा वापर केला जावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. पालिकेने स्वच्छता अभियानात बाजी मारून नावलौकीक केलाय. हे सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच शक्य झाले. मात्र, कामावर हजर असणारे अनेक स्वच्छता कर्मचारी व्यसन करून असतात. त्यांचे संसार धोक्यात आलेत. प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेऊन व्यसनांच्या आघारी गेलेल्या समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रशांत आपटे यांनी केली.
konkansamwad 
