सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जानेवारी रोजी संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे आयोजन.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जानेवारी रोजी संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

  शासनाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम दि. २२ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी दि. २० जानेवारी  रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या कालावधीत स्वच्छ करण्यात येणार असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे.
   ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम राबविण्याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडुन सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणा यांचा सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते स्वच्छ धूळमुक्त करणे, गल्लीबोळातील कचरा काढणे, गटारे, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांचा परिसर स्वच्छ करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, अनाधिकृत फलक, भित्तीपत्रके, बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकणे, तसेच ग्रामणी भागातील सार्वजनिक ठिकाणांवर दर्शनी भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करणे अशा कार्यवाहीचा समावेश करण्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन आपल्या कार्यक्षेत्रात दि. २२ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे.
   जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये स्वच्छता अभियान व रोशणाई करण्याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सूचना प्राप्त असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व मंदिरे व आसपासच्या परिसरातील स्वच्छता मोहिम कार्यक्रमांचे आयोजन एकाच दिवशी दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत करण्यात आले आहे. तालुकास्तरावर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सूचना दिल्या आहेत. तरी जिल्हावासियांनी या कार्यक्रमांत सहभाग घ्यावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकुर  यांनी केले आहे.