वेंगुर्ला न.प.च्या महोत्सवात सौंदर्य व नृत्याचा संगम
वेंगुर्ले
वेंगुर्ले नगर पालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २१ मे रोजी 'वेंगुर्ला सुंदरी' व भारतीय संस्कृतीवर आधारित ग्रुपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कुत्रीम बुद्धिमत्ता आदी खात्यांचे मंत्री आशिष शेलार व बंदरे व मत्स्य व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले कॅम्प येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर होणाऱ्या तीन दिवशीय स्वच्छता व सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गुरुवार २१ रोजी रात्री ९ वाजता एकाचवेळी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. राज्याचे बंदरे व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व नजीकच्या गोवा राज्यातील काही संघांना या स्पर्धेत स्थान देण्यात येणार आहे. भारताची समृद्ध संस्कृती, परंपरा, लोककला, विविधता आणि राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती, सण-उत्सव, संत परंपरा, ऐतिहासिक वारसा, लोककला किंवा विविध राज्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, चित्रपट वारसा यांचे दर्शन घडविणाऱ्या 'भारतीय संस्कृती या थीमवर आधारित ही स्पर्धा असणार आहे. प - त्येक संघात किमान ६ व कमाल १५ स्पर्धक असावेत. वादकांची गणना संघात होणार नाही. ही स्पर्धा १४ वर्षावरील वयोगाटासाठी एकाच गटात घेण्यात येईल. सादरीकरणासाठी किमान ५ मिनिटे व कमाल १० मिनिटे वेळ दिला जाईल. संगीतामध्ये अश्लील, आक्षेपार्ह किंवा समाजविघातक आशय नसावा. लाईव्ह संगीत वापरण्यास मुभा आहे. धोकादायक साहित्य, अग्नि, फटाके किंवा रंगमंचास हानी पोहोचविणारे साहित्य वापरण्यास मनाई राहील. स्पर्धेपूर्वी किमान १ तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक राहील, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नृत्याविष्कारास रोख १०,१५० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी रोख ७१५०, तृतीय क्रमांकासाठी रोख ५१५० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांसाठी प त्येकी रोख २१५० रुपये पाच प्रोत्साहनपर क्रमांकांसाठी रोख ११५० रुपयांचे पारितोषिक तसेच चषक व प्रमाणपत्रे अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत केवळ दहा संघांनाच प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक संघांनी तात्काळ नगरसेविका रिया केरकर ९८६०६९६४२३ यांच्याशी संपर्क साधावा.
स्वच्छ व सुंदर वेंगुर्ला शहराला अधोरेखित करण्यासाठी 'वेंगुर्ला सुंदरी २०२६' ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती या थीमवरील ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल. पहिली फेरी भारतीय पारंपरिक वेषभूषेवर आधारित असणार आहे. या फेरीत स्पर्धकांनी स्वतःची ओळख आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत करून देणे अपेक्षित आहे. दुसरी फेरी कला सादरीकरणाची असून यात स्पर्धकांनी भारतीय लोकजीवनाशी निगडित स्वतःला अवगत कोणतीही कला सादर करणे अपेक्षित आहे. कला सादरीकरणासाठी कमाल तीन मिनिटांचा वेळ देण्यात येईल. गायन, अभिनय, वक्तृत्व, नृत्य, स्टॅण्डअप कॉमेडी किंवा अन्य कोणतीही भारतीय कला स्पर्धकांना सादर करता येईल. तिसरी फेरी आत्मविश्वास, व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित असेल. या फेरीत स्पर्धकांना वेस्टन वेशभूषा करण्यास मुभा असेल. परीक्षक या फेरीत स्पर्धकांना विविध प्रश्न विचारून सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचीही स्टेस्ट घेतील.
स्पर्धेतील वेंगुर्ला सुंदरी २०२६ हा किताब पटकाविणाऱ्या सौंदर्यवतीस रोख रुपये १५,१५०, द्वितीय क्रमांक विजेतीस रोख १०,१७० व तृतीय विजेत्या सौंदर्यवतीस रोख ७१५० रुपयांचे रोख पारितोषिक, क्राऊन, सौंदर्यपट्टा व चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय बेस्ट स्माईल, बेस्ट हेअरस्टाईल, बेस्ट पसर्नालिटी, बेस्ट कॉश्युम व बेस्ट कॅटवॉक या वैयक्तिक बक्षिसांसाठी प्रत्येकी रोख २१५० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १६ स्पर्धकांनाच सहभाग देण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुली असल्याने महाराष्ट्र व गोव्यातील स्पर्धकांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सहभाग निश्चित करण्यासाठी इच्छुकांनी तात्काळ महेंद्र मातोंडकर ९१५८८८१६१८ किंवा नगरसेवक प्रितम सावंत यांच्याशी संपर्क साधावा. या दोन्ही स्पर्धाच्या समन्वयक म्हणून वेंगुर्ले पालिकेच्या अधिकारी स्नेहल शिंदे काम पाहत आहेत.
या दोन्ही स्पर्धामध्ये सहभागी होऊन वेंगुले नगर पालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव यादगार करावा, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी केले आहे.
konkansamwad 
