नांदेड येथील शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक; यंदाही मतदानाचा हक्क बजावणार.

नांदेड येथील शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक; यंदाही मतदानाचा हक्क बजावणार.

नांदेड.

      देशात लोकसभेसाठी १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून मतदानाचा हक्क बजावलेले आजाेबा यंदाही त्याच हिरीरीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शंभरी पार केलेल्या या आजाेबांचे नाव आहे निवृत्ती दारवटकर.ते सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावचे रहिवासी आहेत.
   दारवटकर यांनी यंदा १०२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या वयातही तरुणाईला लाजवेल, अशी इच्छाशक्ती त्यांच्यात दिसते. त्यांचा जन्म १९ मे १९२३ रोजी नांदेड गावात झालेला. सलग साेळा निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावलेले दारवटकर यंदाही आवर्जून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी आपले कर्तव्य न बजावता पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या पिढीपुढे कर्तव्यातून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या दारवटकर यांनी देशात १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आत्तापर्यंतच्या सर्व १६ लोकसभा निवडणुकांत हिरीरीने सहभाग घेतला आहे, हे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांनी लोकांसाठी निवडून देऊन लोकशाहीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे जिकडे तिकडे उल्हासपूर्ण वातावरण होते. त्याकाळी पुणे लोकसभा मतदारसंघात नांदेड हा पश्चिम हवेलीचा भाग होता आणि त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नरहरी गाडगीळ हे उमेदवार होते. त्या निवडणुकीत दारवटकर हे काँग्रेससाठी प्रचारात सहभागी झाले हाेते. तेव्हापासून आजवरच्या सर्व निवडणुकांत हिरीरीने सहभाग घेत मतदान केल्याचे ते आवर्जून सांगतात. खडकवासला मतदारसंघात यंदा मंगळवारी (दि.७) हाेणाऱ्या मतदानातही ते सहभागी हाेणार आहेत. निवृत्ती दारवटकरांचे शिक्षण तिसरीपर्यंत झाले असून, त्यांनी मोडी लिपी अवगत केली आहे. ते मोडी लिपी वाचू शकतात, तसेच लिहू शकतात. लहानपणापासून कुस्तीचे वेड असल्यामुळे कुस्ती क्षेत्रात त्यांनी चांगले नाव कमावले होते. त्यांच्या कुटुंबात दोन मुले आणि पाच मुली असा परिवार आहे. फळांचे व्यापारी म्हणून मार्केट यार्ड तसेच भाजी मंडई येथे ते प्रसिद्ध आहेत.