कणकवली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम...नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती
कणकवली
शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत शहरात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येत असून, शहर विकासासाठी काही कडू निर्णय घ्यावे लागतील, मात्र ते आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सत्यजित पारकर उपस्थित होते. नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, फूटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि विस्कळीत बाजार व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांबाबत नागरिकांसह पत्रकारांकडून सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार नगरपंचायतीतर्फे विविध विषयांचा अभ्यास करण्यात आला आहे.कणकवली शहरात सुमारे ५०० ते ६०० रिक्षा असून, शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. नाका चौक ते पोलिस ठाणे, जाणवली पुलापर्यंतचा परिसर, नाका चौक ते गडनदी परिसर, बाजारपेठ, भालचंद्र महाराज मठाकडे जाणारा रोड, डीपी रोड आणि कॉलेज रोड या भागांमध्ये विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे.दरम्यान फूटपाथवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे श्री. पारकर म्हणाले.
konkansamwad 
