तेंडोलीत १९ एप्रिल पासून श्री देव रवळनाथ पंचायतनचा भव्य वर्धापन सोहळा

तेंडोलीत १९ एप्रिल पासून श्री देव रवळनाथ पंचायतनचा भव्य वर्धापन सोहळा

कुडाळ

 

   कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज धार्मिक विधी, कीर्तन, नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्याच्या मुख्य दिवशी, म्हणजेच २३ एप्रिलला सकाळी ९:३० वाजता गोकर्ण पीठाचे श्रीमद् शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांसोबतच भाविकांच्या मनोरंजनासाठी तेंडोलकर दशावतार मंडळ, 'श्रींची इच्छा' कलामंच यांची संगीत नाटके, तसेच स्थानिक मंडळांच्या एकांकिका आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.२४ एप्रिलला सकाळी अभिषेक सांगता महापूजा आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी वावळेश्वर दशावतार मंडळाचे नाटक होईल. २५ एप्रिलला देवांच्या तरंगांचे सातेरी मंदिरात आगमन होऊन या सोहळ्याची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार समिती आणि तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.