सोनुर्लीत सात ते आठ लाखांचा बेकायदेशीर खैर साठा जप्त
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील मौजे सोनुर्ली येथे विनापरवाना खैर लाकडाची वाहतूक करून त्याचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची शहनिशा करून आजगाव वनपरिमंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली असता, त्या ठिकाणी खैर प्रजातीचा नगी आणि किटा प्रकारचा माल आढळून आला. वनविभागाने हा सर्व माल जप्त केला असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये इतकी आहे.या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, हा विनापरवाना लाकूड साठा निरवडे येथील प्रदीप मातोंडकर यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर वन कायद्यानुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सोनुर्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडांची तोड करून त्याचा साठा केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अतुल पाटील आणि वनमजूर चंद्रकांत पडते यांनी ही कारवाई केली.घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये काही लाकूड हे नगी तर काही किटा स्वरूपाचे आहे. सदरचे लाकूड वनविभागाने तात्काळ ताब्यात घेतले असून या मालाबाबत रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आजगाव वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे सोनुर्लीसह संपूर्ण तालुक्यामध्ये खैर तस्करी करणाऱ्यांमध्ये तसेच अवैध लाकूड व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
konkansamwad 
