अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा १ लाख मराठा उद्योजकांना लाभ.
मुंबई.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून १ लाख उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली आहे.त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सत्कार केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत १,००,०१४ लाभार्थी झाले असून, ८३२० कोटी रुपये बँकानी व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने ८३२ कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.
मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले व या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या महामंडळाच्या अध्यक्ष पदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.
अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करून महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करून मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले. तसेच राष्ट्रियकृत व सहकारी बैंकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदय यांचेबरोबरच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रियकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.