ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले ‘मेंडिझ'' वाहन’.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले ‘मेंडिझ'' वाहन’.

रत्नागिरी.

     चिपळूण सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी अनोखे असे ''मेंडिझ'' वाहन तयार केले आहे.दोन माणसांच्या सुरक्षित प्रवासासाठी ही मेंडिझ उपयोगात येऊ शकते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा अनोखा प्रयोग एस. क्रीएटर्सच्या प्रदर्शनात मांडला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.एस. क्रीएटर्सच्या प्रदर्शनात येथील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी ४२ मॉडेल्स मांडली आहेत. त्यात मेंडिझ हे वाहन लक्षवेधी ठरले आहे. या मेंडिझचे वैशिष्ट्य म्हणजे विजेवर चालणारे हे वाहन असून, स्कूटर आणि कार यामधील हे वाहन ठरणार आहे. त्यामुळे स्कूटर आणि कार चालवल्याचा अनुभव या वाहनात बसल्यावर येणार आहे. अनेकवेळा आडवळणाच्या रस्त्यावर आणि कोकणातील घाटरस्त्यांमध्ये मोटारसायकल घसरून अपघात होतो. त्यामध्ये अनेकांना जीव गमावावा लागतो, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ही अनोखी मेंडिझ तयार केली आहे. त्यामुळे वळणावळणाच्या रस्त्यावर ही मॅंडिझ चालकाला सुरक्षित प्रवासाची हमी देते. दोन माणसे यामध्ये पुढे आणि मागे अशा पद्धतीने बसू शकतात. सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत लाभदायी ठरणार असून, दोन लोकांना ही सहजपणे सफर घडवू शकते.हा प्रकल्प तयार करण्यासाठी अश्लेष निवाते, सिद्धेश जाधव, सार्थक खेडेकर, प्रतीक नरेवळी, राज तुळसणकर, मंथन वाणी, रोहन गवळी, सुमित शिर्के, संकेत राव, दर्शन महाडिक, सोहम समेळ आणि शुभम निर्मळ या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या प्रकल्पासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. एम. आर. साळुंखे, प्राचार्य मंगेश भोसले यांनी महत्वाची भूमिका निभावली. एस. क्रीएटर्स या प्रदर्शनात हे मेंडिझ वाहन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
   वजन अवघे १५० किलो अपघातमुक्त अशी ही गाडी तीनचाकी असून, १,२०० किलोवॅटची मोटर आहे. ती १५० ते १८० कि. मी. प्रवास करू शकते आणि १२० प्रती कि. मी. चालवता येऊ शकते. तिचे वजन अवघे १५० किलो असून, निर्धोक प्रवासासाठी मेंडिझ उपयुक्त ठरणार आहे.