भाजप पक्षाच्यावतीने उद्या सावंतवाडीत जागतिक योग दिन साजरा होणार

सावंतवाडी
संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. सावंतवाडी-राजवाडा येथे उद्या सकाळी ६ वाजता योगा दिन साजरा करण्यात येणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, युवा नेते संदीप गावडे, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, ॲड. चैतन्य सावंत, अनिकेत आसोलकर, दया गावडे आदी उपस्थित होते. युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाच महत्व जगाला पटवून दिले आहे. तसेच योगा हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रोगराई, विकार, आजरपणाला दूर करण्यासाठी योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यात यावे यासाठी योगा करावा, असे आवाहन भोसले यांनी केले. दरम्यान युवा नेते संदीप गावडे म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ ला पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. उद्या १० वा योगदिन होत असून सकाळी ६ वा. हा कार्यक्रम सावंतवाडी राजवाडा येथे संपन्न होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गावडे यांनी केले.