उभादांड्यातील दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान.....साईकृपा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

उभादांड्यातील दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान.....साईकृपा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

कुडाळ

 

      दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ओरस यांच्या वतीने उभादांडा येथील कल्पना एकनाथ बांबार्डेकर या दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.उभादांडा शाळा क्रमांक २ परिसरात राहणाऱ्या कल्पना बांबार्डेकर यांना दैनंदिन हालचाली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. संस्थेचे प्रतिनिधी अनिल शिंगाडे यांच्या हस्ते व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुनील कांबळी, हर्षद खरात, सेजल तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. असे उपक्रम दिव्यांग बांधवांना नवे बळ, आत्मविश्वास आणि समाजातील आपलेपणाची जाणीव देतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.व्हीलचेअर मिळाल्याने कल्पना बांबार्डेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत संस्थेसह सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सहाय्य पुरविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.