पाणलोस येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ......ग्रामपंचायत मठबुद्रुक व आरोग्य उपकेंद्राचा संयुक्त उपक्रम....शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या संकल्पनेतून आयोजन
मालवण
ग्रामपंचायत मठबुद्रुक व आरोग्य उपकेंद्र मठबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोस येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा उपसरपंच विनायक बाईत आणि निलेश बाईत यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. विनायक बाईत यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच मोहन वेंगुर्लेकर यांच्या यशस्वी नियोजनातून हे शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासोबतच आवश्यक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत व सहकारी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. या शिबिरावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सरपंच मोहन वेंगुर्लेकर, निलेश बाईत, ग्रामपंचायत सदस्या लीना बाईत, आशा सेविका आकांक्षा बाईत, आरोग्य सेवक नाटेकर, आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
