जि.प.शाळा मठ कणकेवाडी नं.३ चा स्तुत्य उपक्रम......शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मिळून नदीवर बांधला वनराई बंधारा
मठ
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, भूजलपातळी वाढावी तसेच परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यास हातभार लागावा, या उद्देशाने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी नं. ३ यांच्या वतीने शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहभागातून नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील पर्यावरण शिक्षण न देता प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारण, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने श्रमदान करत वनराई बंधारा उभारण्यात सहभाग घेतला. सामूहिक श्रमदानातून उभारलेला हा बंधारा परिसरातील पाणी साठवणूक व भूजल संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे.या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुदेश राणे, सदस्य श्री. रामचंद्र परब, श्रीम. सुवर्णा राणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामा पोळजी, शिक्षक श्री.प्रकाश भोई, श्रीम.राजश्री घोरपडे, अंगणवाडी सेविका श्रीम.ज्योती परब, श्रीम. सावंत, श्रीम. आईर तसेच मदतनीस श्रीम. गावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत शाळेने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
konkansamwad 
