सावंतवाडी मोरडोंगरीत पाण्यासाठी खोदाई करताना गॅस पाईपलाईन फुटली
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील मोरडोंगरी परिसरात मंगळवारी दुपारी नळ पाणी योजनेसाठी खोदाई सुरू असताना नॅचरल गॅसची मुख्य पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेचे वृत्त समजताच सत्ताधारी नगरसेविका नीलम नाईक आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी धाव घेतली.जेसीबीचा जोरात धक्का लागल्याने पाईपलाईनला भगदाड पडले आणि गॅसचा मोठा प्रवाह हवेत पसरला. सुदैवाने, तांत्रिक यंत्रणेने वेळीच मुख्य पुरवठा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून मोरडोंगरी भागात नळपाणी योजनेचे काम सुरू आहे.मंगळवारी दुपारी या कामासाठी जेसीबीच्या सहायाने खोदाई केली जात होती. मात्र, जमिनीखाली असलेल्या गॅस पाईपलाईनचा अंदाज न आल्याने जेसीबीचा पंजा थेट पाईपलाईनला लागला. यामुळे पाईपलाईन फुटून मोठ्या दाबाने गॅस बाहेर पडू लागला.गॅस बाहेर पडण्याचा आवाज इतका मोठा होता की, स्थानिक नागरिक घराबाहेर पडले आणि परिसरात घबराट पसरली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली, तर बेजबाबदार काम सुरू असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केला. घटना घडल्यानंतर बराच वेळ होऊनही नगरपालिकेचा जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले होते.घटनेची माहिती मिळताच गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्य पुरवठा खंडित केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, 'हा नॅचरल गॅस असल्याने तो हवेच्या संपर्कात आल्यावर विरघळून जातो. त्यामुळे स्फोटाचा किंवा आगीचा कोणताही धोका नाही. खबरदारी म्हणून सध्या या भागातील गॅसपुरवठा बंद केला असून, दुरुस्तीनंतर तो पूर्ववत करण्यात आला.
konkansamwad 
