बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालणारे शासन....आदिवासींच्या घर, जमीन आणि शिक्षणाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री नीतेश राणे

बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालणारे शासन....आदिवासींच्या घर, जमीन आणि शिक्षणाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री नीतेश राणे


कणकवली


          क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी 'जल, जंगल आणि जमीन' या मूलभूत हक्कांसाठी दिलेला लढा आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिनीची मालकी आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार गेल्या दोन वर्षांपासून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर उपस्थित होत्या. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना हक्काचा निवारा आणि पुढील पिढीला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी आयुष्यभर संघर्ष केला; हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व वन विभागाने आदिवासींच्या जमीन आणि घरांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, वर्षानुवर्षे वास्तव्य असलेल्या जमिनीवर त्यांना कायदेशीर हक्क आणि महसूल नोंदीत स्थान मिळवून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातकरी आणि ठाकर समाजाची लोकसंख्या ०.८२ टक्के इतकी असली तरी त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ न देता जिल्हा नियोजन समितीतून वस्ती सुधारणा, घरकुल आणि शिक्षणासाठी भरीव निधी दिला जात आहे; ज्यामध्ये ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतून २०२३-२४ मध्ये १९.९३ लाख, २०२४-२५ मध्ये ३२.८३ लाख रुपये खर्च करण्यात आले, तर २०२५-२६ साठी ४४.७७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून शबरी आवास योजनेंतर्गत २९ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे. यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही आदिवासी घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून दिली असून, उदय आहेर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कातकरी समाजातील मुलांना लॅपटॉप व इतर शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून वंचितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य महायुती सरकार अविरत सुरू ठेवेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री राणे यांनी यावेळी व्यक्त केला.