डिलिमिटेशन बिलावर राष्ट्रवादीत मतभेद....सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर नताशा आव्हाड यांची नाराजी, ट्विटने वेधले लक्ष
राज्यात सध्या मतदारसंघ पुनर्रचना अर्थात 'डिलिमिटेशन' बिलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला असून, यावरून महाविकास आघाडीमध्ये आणि आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मतभेद समोर आले आहेत. सर्व राज्यांमध्ये ५० टक्के जागा वाढवल्यास डिलिमिटेशन बिलाच्या पाठिंब्यावर विचार करू, असे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिले होते. मात्र, या भूमिकेवर पक्षातूनच वेगळा स्वर उमटला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी या संभाव्य भूमिकेवर उघडपणे आपली मते मांडत एक ट्विट केले आहे. नताशा आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून भाजपच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच पक्षाने यावर फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर माझा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल आणि या अफवा खऱ्या असतील, तर मी या निर्णयावर आक्षेप घेते. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुनर्रचना आवश्यक असली, तरी हे प्रस्तावित विधेयक म्हणजे विरोधी पक्षाच्या जागा मर्यादित करून भाजपला फायदा मिळवून देणारा प्रयत्न असल्याचे दिसते. आपली लोकप्रियता कमी होत चालल्याने हा भाजपचा एक प्रयत्न आहे. पुढे बोलताना नताशा आव्हाड यांनी म्हटले आहे की, ज्या कोणाला देशाची लोकशाही व्यवस्था टिकवायची आहे, त्यांनी या विधेयकाला विरोध केला पाहिजे. या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे राष्ट्र आणि संविधानासाठी योग्य ठरणार नाही. मला आशा आहे की, पक्ष आपल्या या भूमिकेचा गांभीर्याने पुनर्विचार करेल. नताशा आव्हाड यांच्या या भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळात या मुद्द्यावर नवीन चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात पक्ष यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
