वेंगुर्ले येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप; पंचायत समिती सभापतींचा पुढाकार

वेंगुर्ले येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप; पंचायत समिती सभापतींचा पुढाकार

वेंगुर्ले

 

    समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पंचायत समिती कार्यालयातील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार श्रवणयंत्रे, व्हीलचेअर आणि वॉकरचे वितरण करण्यात आले. साहित्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धुवा महादेव म्हापसेकर, साई सचिन पडते, तन्वी महेश शिरोडकर, समर्थ हेमंत आंबेरकर (श्रवणयंत्र), हर्षिता रविंद्र केळुसकर, करण संतोष होडावडेकर, भक्ती कृष्णा शेलटे (व्हीलचेअर) आणि श्रीया सुनिल परब (वॉकर) यांचा समावेश होता. या प्रसंगी बोलताना सभापती शंकर घारे यांनी स्पष्ट केले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आवश्यक ते सहाय्य मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पंचायत समितीमार्फत भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी संतोष गोसावी, सहाय्यक प्रशासन अधिकारी संदीप तांबे, महेश नाईक, विषय तज्ञ विनोद सावंत, श्री. भोकरे, मिलिंद सरवंदे, श्री. पवार, नितीन चव्हाण आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे लाभार्थी विद्यार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.