नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत
कणकवली
राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या, सोमवार ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या समवेत कणकवली तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमात नागरिकांना शासकीय कामांशी संबंधित अडचणी, समस्या व विविध मागण्यांची लेखी निवेदने थेट मंत्र्यांकडे सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.कार्यक्रमादरम्यान केवळ निवेदने स्वीकारली जाणार असून कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ किंवा इतर सत्कार साहित्य आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.कणकवली व परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
konkansamwad 
