नुकसान झालेल्या देवगड येथील बागांची पालकमंत्र्यांकडून पाहणी....लवकरच मदतीची घोषणा केली जाईल; पालकमंत्र्यांचे आश्वासन
देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बागायतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.यावेळी राणे म्हणाले नुकसानग्रस्त आंबा उत्पादकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि लवकरच या मदतीची घोषणा केली जाईल. केवळ आर्थिक मदतच नाही, तर भविष्यात हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की, बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून आंबा शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन प्रणालीचा वापर करण्याबाबत पावले उचलली जात आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आंबा बागांचे व्यवस्थापन वैज्ञानिक पद्धतीने करणे सोपे होईल, ज्यामुळे हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल.या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

konkansamwad 
