आंबा, काजू बागायतदारांना दोन दिवसांत नुकसान भरपाई; जिल्हाधिकाऱ्यांची लेखी ग्वाही....नांदगाव येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित
कणकवली
कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू बागायतदारांना दोन दिवसांत नुकसान भरपाई जाहीर होणार आहे. चालू अधिवेशनात याबाबतचा निर्णय होईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दिली. त्यानंतर दोन दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान अधिवेशनात याबाबत कोणताच निर्णय न झाल्यास पुढील दोन दिवसांत ओरोस येथे सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. हे आंदोलन आम्ही वर्षा बंगल्यावरच करणार आहोत. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी होतील अशीही माहिती राजू शेट्टी यांनी दिली. नांदगाव येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी सव्वा अकरा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह आंबा बागायतदारांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र हे आंदोलन मोडून काढण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली. हे समजताच दुपारी साडे बारा वाजता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह सर्व आंदोलकांनी कणकवलीत येऊन रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी कणकवलीच्या दिशेने कूच केले. नांदगाव पासून चार किलोमीटर अंतरावरील पावाची वाडी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्यावतीने अांबा आणि काजू बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याबाबत दोन दिवसात आणि अधिवेशन सुरू असतानाच निर्णय घेतला जाईल अशी लेखी ग्वाही दिली. राज्य शासनाचा हा निर्णय मान्य आहे का? अशी विचारणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांना केली. आंदोलनकर्त्यांनी त्याला पाठिंबा देताच राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले पत्र आंदोलकांना वाचून दाखवले. त्यानंतर आंब्याला हेक्टरी ५ लाख आणि काजूसाठी हेक्टरी ३ लाख रूपये भरपाई न मिळाल्यास पुन्हा मुंबईत वर्षा बंगल्यावर आंदोलन छेडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
konkansamwad 
