सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग
जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.जिल्ह्यातील सायबर गुन्हे आणि ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने आणि जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हे व ऑनलाईन गेमिंगशी संबंधित गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही आठवड्यांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांनी चिंता व्यक्त केली.पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे मटका आणि जुगाराची अनेक पारंपरिक केंद्रे बंद झाली असली तरी, आता या गैरप्रकारांचे स्वरूप ऑनलाईनकडे वळत आहे. तरुण वर्ग ऑनलाईन मटका, गेमिंग आणि तत्सम डिजिटल प्लॅटफॉर्मच्या संपर्कात येत असल्याने त्यावर नियंत्रण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.ऑनलाईन गेमिंगच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नैराश्य वाढत असून काही वेळा गंभीर परिणाम समोर येत आहेत. याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयाने स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून, सिंधुदुर्गची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून जिल्ह्यासाठी विशेष टीम, अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.तरुण पिढी सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात किंवा ऑनलाईन जुगार व गेमिंगच्या आहारी जाऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. सायबर गुन्ह्यांचे डिटेक्शन वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, आगामी काळात या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
konkansamwad 
