वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर -जिल्हाधिकारी

वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर -जिल्हाधिकारी

 

सिंधुदुर्गनगरी

 

      संपूर्ण समाज हा आपल्या वीर जवानांचा सदैव ऋणी आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. वीर जवानांचे कुटुंब हे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे ही केवळ जबाबदारी नसून आपली नैतिक कर्तव्य आहे. या धारिष्ट्यपूर्ण सेवेसाठी कृतज्ञता म्हणून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
     सशस्त्रसेना ध्वजदिन संकलन -2025 निधी शुभारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई,  सहायक जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी शहिद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करुन  शहिद जवानांना श्रदांजली अर्पण करण्यात आली.  कार्यक्रमात ध्वजदिन -2025 चा निधी संकलन शुभारंभ देखील जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  वीरनारी, वीरमाता-पिता यांना साडी, शॉल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय क्षेत्रात व क्रिडा क्षेत्रात बहुमुल्य कामगीरी करणाऱ्या माजी सैनिक, विधवा पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रशस्ती प्रत्रक व धनादेश सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत प्रधान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात  इयत्ता 10 वी 90 टक्के व इयत्ता 12 वी 85टक्के  पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उतीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
   जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच सेवारत सैनिकांच्या परिवारांच्या कल्याणासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या पुनर्वसन, सामाजिक सुरक्षा, रोजगारसंधी, तसेच तातडीच्या मदतीसंबंधी आवश्यक ती सर्व सहाय्ये प्राधान्याने उपलब्ध करून दिली जातील. सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाच्या सीमांचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करताना तसेच देशात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था विषयक समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भूकंपसारख्या आपत्तीत दुर्देवी नागरिकांच्या सहाय्याला त्वरेने धावून जावून बहुमोल कामगिरी बजाविणाऱ्या आपल्या सैनिकांचे ऋण अल्पस्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त झाली. तिचा पुरेपूर फायदा घेवून जनतेने ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करणे हे बहुमोलाचे कर्तव्य जनतेने समजावे. सन २०२४ मध्ये आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १०५.८१ टक्के पुर्ण केले आहे. व त्याची पोच पावती म्हणून आपला जिल्हा कोकण विभागात प्रथम येण्याचा मान प्राप्त झाला आहे. यामध्ये मुख्यतः आपला सर्वांचे योगदान आहे. मला खात्री आहे, की सन २०२५ चे उद्दिष्ट हेही यापेक्षा जास्त कराल असेही त्या म्हणाल्या.
   जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. दहिकर म्हणाले, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती संपूर्ण समाज मनोपूर्वक कृतज्ञ आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या वीर जवानांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. सैनिकांचे त्याग बहुमोल आहे. त्यांच्या कुटुबियांची सेवा करुन आपण उत्तरदायित्व पार पाडणे आपले कर्तव्य असल्याचे श्री. दहिकर म्हणाले.
      प्रास्ताविकात श्रीमती देसाई म्हणाल्या, 28 ऑगस्ट 1946 रोजी भारताच्या रक्षा मंत्रालयाव्दारे रक्षा मंत्र्यांच्या अध्यक्षतेत गठीत केलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार स्वातंत्र्य भारताचा सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 07 डिसेंबर हा ठरविण्यात आला. त्यानुसार दिनांक 07 डिसेंबर 1949 पासून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सशस्त्र सेना ध्वजदिनाचे महत्व असे की, स्थलसेना, नौसेना व वायु सेनादल यांच्या सैनिकांव्दारे देशाच्या सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या योगदानाची आठवण करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येतो. दिनां‍क 07 डिसेंबर पासून निधी संकलनाचा शुभारंभ करून पुढील वर्षाच्या 30 नोव्हेंबर पर्यत संकलन केले जाते. निधी संकलनाकरीता पावत्या, बंद डबे तसेच छोटे व मोठे ध्वज, विविध रक्कमांच्या पावत्या व्दारे निधी संकलन करून जिल्हयाला देण्यात आलेले  उद्दिष्ट पूर्ण  केले जाते असेही त्या म्हणाल्या.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी तर आभार  सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी मानले.