'महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर'ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर'ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी

 

      'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर' या उपक्रमाला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वॉकेथॉनमध्ये जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी ६ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर या महा वॉकेथॉनची सुरुवात झाली. प्रारंभी सहभागींसाठी वॉर्मअप घेण्यात आला, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, दीपलक्ष्मी पडते, कार्यकारी अभियंता संतोष शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सर्व सहभागींना जलसंधारणाची शपथ दिली. उपस्थितांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, एल निनोमुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून भविष्यातील संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचविणे आवश्यक आहे. शेतीसाठी कमी पाण्यात घेता येणाऱ्या पर्यायांचा अवलंब करण्यासोबतच जनजागृतीच्या माध्यमातून मृद व जलसंधारणासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलसंधारण सप्ताहात जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आभार मानून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मृद व जलसंधारणाची चळवळ उभी राहत असल्याचे गौरवोद्गार काढले.यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून 'महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर'ला सुरुवात करण्यात आली. 'माती वाचवा, पाणी जपा'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत सहभागी नागरिकांनी उत्साहात हा वॉक पूर्ण केला.या वॉकेथॉनमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील वैभव नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत २५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले, तर वैभववाडी येथील वैभव वाघमोडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून १५ हजार रुपये आणि सिंधुदुर्गनगरी येथील अभिजीत जेडयार यांनी तृतीय क्रमांक मिळवून १० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. याशिवाय ईश्वरी चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या सात स्पर्धकांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या आयोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलॅटिक संघटनेच्या कल्पना तेंडुलकर आणि बाळकृष्ण कदम यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले.