वेंगुर्लेतील नवीन 'नमो उद्यान' नागरिकांसाठी खुले, लवकरच होणार अधिकृत लोकार्पण

वेंगुर्लेतील नवीन 'नमो उद्यान' नागरिकांसाठी खुले, लवकरच होणार अधिकृत लोकार्पण

वेंगुर्ला

 

   शासनाच्या योजनेनुसार वेंगुर्ला नगरपरिषदेने उभारलेले नवीन 'नमो उद्यान' आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. नुकतीच विशेष तपासणी समितीने या उद्यानाला भेट देऊन कामाचा दर्जा, नियोजन आणि सुविधांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीनंतर उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून लवकरच त्याचा अधिकृत लोकार्पण सोहळा पार पडेल, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.राज्य शासनाच्या 'नमो उद्यान' संकल्पनेअंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून वेंगुर्ल्यात हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे.उद्यानाची तपासणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खेबुडकर, नगरपरिषद प्रशासनाचे विभागीय सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपआयुक्त सागर ढोलप, कार्यकारी अभियंता रुपाली पाटील आणि स्थापत्य अभियंता शशिकांत पवार यांचा समावेश होता. समितीने उद्यानातील कामाची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांची बारकाईने पाहणी केली. तसेच हे उद्यान अधिक सुंदर, आकर्षक आणि नागरिकांसाठी सोयीस्कर व्हावे यासाठी काही उपयुक्त सूचनाही केल्या.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी समितीचे स्वागत केले. या प्रसंगी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हे उद्यान स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक राहावे. तसेच नागरिकांना विरंगुळा, आरोग्य आणि मनोरंजनासाठी उत्तम जागा मिळावी यासाठी नगरपरिषद प्रशासन पूर्ण काळजी घेत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.