संकटातील जीवांचे तारणहार रामदास नाईक व महेश राऊळ यांचा नागपंचमीनिमित्त गौरव
तुळस
नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त जीवदया, वन्यजीव संरक्षण आणि सर्पसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रामदास नाईक ऊर्फ काळाबाबु आणि सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांचा भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला.तुळस येथे झालेल्या या कार्यक्रमात दोघांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.रामदास नाईक हे नदी, विहीर, तलाव व जंगल परिसरात अडचणीत सापडलेल्या साप, मगर, गाय, बैल, रेडे, कुत्रे तसेच विविध वन्यजीवांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे कार्य करतात. जलस्रोतांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे धाडसी आणि संवेदनशील कार्यही त्यांनी अनेक वेळा केले आहे. प्रसिद्धी अथवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ते ही सेवा बजावत आहेत.महेश राऊळ गेल्या १५ ते २० वर्षांपासून सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून कार्यरत आहेत. मानवी वस्तीत आलेल्या सापांचे रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम ते करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ३२ जातींच्या सापांचे रेस्क्यू केले आहे. दुर्मिळ कॅस्ट्रो कोरल स्नेकचे तीन वेळा रेस्क्यू करण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. सर्पांविषयी जनजागृती, वन्यजीव रेस्क्यू, रक्तदान चळवळ आणि सामाजिक उपक्रमांमध्येही ते सक्रिय आहेत.यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे म्हणाले, “रामदास नाईक आणि महेश राऊळ यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते संकटातील जीवांचे प्राण वाचवतात. त्यांच्या कार्यातून जीवदया आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळतो.”भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले, “रामदास नाईक यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे धाडसी कार्य कौतुकास्पद आहे. तर महेश राऊळ यांचे सर्पसंवर्धन व जनजागृतीचे कार्य उल्लेखनीय आहे. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.”या कार्यक्रमाला तुळस सरपंच रश्मी परब, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, रामू परब, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाईक, जयवंत तुळसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.नागपंचमीच्या निमित्ताने झालेला हा सन्मान जीवदया, मानवसेवा आणि निसर्गसंवर्धनाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
konkansamwad 
