मालवण येथे पर्यटकाच्या कारची वीज खांबाला धडक

मालवण येथे पर्यटकाच्या कारची वीज खांबाला धडक

मालवण

 

     मालवण वायरी मार्गांवर श्री केळबाई मंदिरासमोर पुणे येथील पर्यटकांच्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजखांबाला धडक दिल्याची घटना घडली. कारच्या धडकेनंतर सिमेंटचा वीज खांब कारवर वाकलेल्या स्थितीत राहिला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. वीज पुठवठा खंडित करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी वीज खांब कारपासून बाजूला केल्यावर वीज वितरण कंपनीकडून हा वीज खांब बदलण्यात आला.पुणे येथून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार सकाळी वायरी रस्त्यावरून तारकर्ली देवबागच्या दिशेने जात होती. यावेळी कारमधील चालकाच्या बाजूला बसलेल्या लहान मुलाने स्टेअरिंगला हात लावल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून केळबाई मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला कारची धडक बसली. या धडकेमुळे वीज खांब मुळातून कलंडून कारवर वाकलेल्या स्थितीत राहिला. तर या धडकेत कारच्या डाव्या बाजूकडील दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच वीज खांब वाकलेल्या स्थितीत राहिल्याने मोठा अनर्थ टळला.