रोटरी आणि खर्डेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्प : समज, गैरसमज आणि संवर्धन’ कार्यशाळा.....सर्पमित्र महेश राऊळ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

रोटरी आणि खर्डेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्प : समज, गैरसमज आणि संवर्धन’ कार्यशाळा.....सर्पमित्र महेश राऊळ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

वेंगुर्ला



      सापांविषयी समाजातील भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्प : समज, गैरसमज आणि संवर्धन’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्पांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, सर्पदंशावर घ्यावयाची प्राथमिक काळजी आणि पर्यावरणातील सापांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते प्रसिद्ध सर्पमित्र आणि समाजसेवक महेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “साप हा माणसाचा शत्रू नसून निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. उंदीर, घुशी यांची संख्या नियंत्रित ठेवण्यात सापांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे सापांचे अस्तित्व पर्यावरणीय समतोलासाठी अत्यावश्यक आहे.”साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्राची मदत घ्यावी, असे आवाहन करताना राऊळ म्हणाले, “साप माणसावर हल्ला करण्यासाठी फिरत नाही. तो स्वतः माणसापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची आहे.”साप दूध पितो, साप सूड घेतो, सापाच्या डोक्यावर नागमणी असतो यांसारख्या अनेक अंधश्रद्धांवर राऊळ यांनी भाष्य केले. या सर्व समजुतींना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्पदंश झाल्यास झाडफुंक, मंत्र-तंत्र किंवा जखम कापण्यासारखे घरगुती उपचार न करता तातडीने रुग्णालयात दाखल करावे, यावर त्यांनी भर दिला. “सर्पसंवर्धन म्हणजे केवळ सापांचे संरक्षण नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण आहे,” असेही ते म्हणाले.अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी. गोस्वामी म्हणाले की, गैरसमजांमुळे अनेकदा निरुपद्रवी सापांचाही जीव जातो. विद्यार्थ्यांनी शास्त्रीय माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. महाविद्यालयात अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होते.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या हस्ते झाली. प्रास्ताविक डॉ. वसंतराव पाटोळे यांनी केले. डॉ. सचिन परुळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन सौ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांच्या शुभेच्छा मिळाल्या.रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष रो. प्रथमेश नाईक, सचिव रो. मुकुल सातार्डेकर, खजिनदार रो. उदय दाभोलकर, रो. राजन गिरप आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. राजेश घाटवळ उपस्थित होते. रोटरीचे पर्यावरण संरक्षण हे एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी केले तर आभार प्रा. जे. वाय. नाईक यांनी मानले.