वंदे मातरम चा अपमान कदापि सहन करणार नाही - श्रीकृष्ण परब

वंदे मातरम चा अपमान कदापि सहन करणार नाही - श्रीकृष्ण परब

कणकवली

 

        ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यालय कार्यक्रम स्थळी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी केलेल्या गैरवर्तनाचा जाहीर निषेध करत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यालया समोर संपूर्ण वंदे मातरम गायन करून शांततेच्या मार्गाने खेद व्यक्त करत निषेध केला. प्रसंगी बोलताना भाजपचे सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांनी निवेदन केले की
        आज इथे एका अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी विषयावर बोलण्याची पाळी आली . ज्या गीताने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ज्या शब्दांनी लाखो तरुणांना फासावर जाताना शक्ती दिली, त्या 'वंदे मातरम' गीताचा केवळ आणि केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी काँग्रेसकडून करण्यात आलेला निषेध आणि अपमान ही आपल्या मातृभूमीशी झालेली मोठी प्रतारणा आहे. 'वंदे मातरम' हा केवळ एक शब्द नाही, तर तो या देशाचा आत्मा आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी जेव्हा हे गीत लिहिले, तेव्हा त्यांनी या मातीला आईचा दर्जा दिला. पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडणाऱ्या भारतवर्षाला जागृत करण्याचे काम या महामंत्राने केले. "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" हे दोनच शब्द असे होते, जे ऐकून इंग्रज राजवटीचे धाबे दणाणायचे. या घोषणा देणाऱ्यांवर ब्रिटिशांनी अमानुष लाठीचार्ज केला, अनेकांना तुरुंगात डांबले, पण तरीही आमच्या पूर्वजांनी वंदे मातरम म्हणणे सोडले नाही.पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधीकाळी या गीताचा अभिमानाने वापर केला, त्याच काँग्रेसने नंतरच्या काळात लांगूलचालनाचे राजकारण सुरू केले. काही विशिष्ट घटकांना खूश करण्यासाठी वंदे मातरम या पवित्र गीताला वादाच्या भोवऱ्यात खेचण्यात आले. संसदेत किंवा अधिकृत कार्यक्रमांमध्ये या गीताचा सामूहिक निषेध करणे, वंदे मातरम सुरू असताना उभे न राहणे किंवा सभागृहातून पळ काढणे, असले प्रकार काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केले आहेत.हा निषेध कोणाचा आहे? हा निषेध त्या भारतमातेचा आहे जिचे अन्न आपण खातो, जिचे पाणी आपण पितो. हा निषेध त्या क्रांतीकारकांचा आहे ज्यांनी 'वंदे मातरम' म्हणत हसत-हसत फासाचे दोर आवळले. केवळ एका विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी आपल्याच देशाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा बळी देणे, ही काँग्रेसची कोणती राष्ट्रभक्ती आहे?जर तुम्हाला तुमच्या मातृभूमीला नमन करायला लाज वाटत असेल, जर तुम्हाला या मातीला 'माता' म्हणण्यात अडचण असेल, तर तुमच्या देशप्रेमावर शंका घेणे भाग आहे. राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे परम कर्तव्य आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण राष्ट्र प्रथम आले पाहिजे. राजकारणासाठी देशाच्या अस्मितेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.काँग्रेसने 'वंदे मातरम'चा केलेला हा निषेध प्रत्येक देशप्रेमी भारतीयाच्या मनाला टोचणारा आहे. आम्ही या व्यासपीठावरून काँग्रेसच्या या भूमिकेचा, त्यांच्या या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध आणि धिक्कार करतो! या देशाला तोडणाऱ्या नव्हे, तर जोडणाऱ्या विचारसरणीची आज गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या अशा राष्ट्रविरोधी मानसिकतेचा कडाडून विरोध केला पाहिजे.शेवटी मी एवढेच म्हणेन की, कितीही विरोध झाला तरी या देशातील प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या हृदयात 'वंदे मातरम'चा आवाज गुंजत राहील आणि आम्ही अभिमानाने म्हणत राहू वंदे मातरम वंदे मातरम – असे निवेदन भाजपचे जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांनी दिले.यावेळी संघटन सरचिटणीस संतोष पुजारे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर,मंडल अध्यक्ष अण्णा खाडये,मंडल अध्यक्ष सर्वेश दळवी, मंडल अध्यक्ष तन्मय वालावलकर, पवन भालेकर,गुरुनाथ वर्देकर, प्रदीप गावडे, स्वप्नील राणे,सागर पवार, उपाध्यक्ष प्रशांत राणे, शहरध्यक्ष सागर राणे, सोमनाथ चव्हाण,नितीन पवार, रोहित ठाकूर उपस्थित होते.