दोडामार्ग तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला.....मनसेचे पोलिसांना निवेदन

दोडामार्ग तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला.....मनसेचे पोलिसांना निवेदन

दोडामार्ग

 

      तालुक्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून जनतेची सुरक्षितता धोक्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दोडामार्ग पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, लगतच्या गोवा राज्यातून पर्यटनाच्या नावाखाली काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दोडामार्ग तालुक्यात येऊन खुलेआम दहशत माजवत आहेत. अलीकडेच शहरातील काही नागरिकांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.तालुक्यात आता पर्यटन हंगाम सुरू झाला असून गोवा, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. यातील अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याने स्थानिक व इतर पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पर्यटन स्थळांवर पोलीस खात्याची करडी नजर असणे आवश्यक असून गस्तीपथके कार्यरत ठेवावीत.  वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी दोडामार्ग शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित आहेत की नाही याची सतत खात्री करावी. काही ठिकाणी गोवा बनावटीची दारू व अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे, यावर तातडीने कारवाई करावी.शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. मोकाट जनावरांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.