देवगड प्रशिक्षणात शिक्षकांचा अवमान....कणकवली प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सिंधुदुर्ग
देवगड येथे 25 जून 2026 रोजी आयोजित बीएलओ व एसआयआर प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांशी अपमानास्पद व अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याप्रकरणी कणकवलीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी सत्यशोधक शिक्षक सभा, सिंधुदुर्ग यांनी केली आहे.संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले की, सकाळी अकरा वाजता सुरू झालेले प्रशिक्षण दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत कोणतीही विश्रांती न देता सुरू होते. यावेळी एका शिक्षकाने केवळ 15 मिनिटांच्या विश्रांतीची विनंती केली असता ती फेटाळून लावत संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांचा अवमान करणारी भाषा वापरली. या प्रकारामुळे शिक्षकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.या घटनेच्या निषेधार्थ 29 जून 2026 रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सत्यशोधक शिक्षक सभेने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.आंदोलनानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त न करता उलट पर्यवेक्षक यंत्रणेमार्फत शिक्षकांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएलओ व एसआयआरची कामे न करण्याचा इशारा सत्यशोधक शिक्षक सभा प्राथमिक व माध्यमिक संघटनेने दिला आहे. शिक्षकांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी अध्यक्ष अमोल कांबळे, उपाध्यक्ष महेश पेडणेकर, सचिव शंकर जाधव, अंकुश कदम, सुलभा तांबे, संतोष पेडणेकर, योगेश सकपाळ यांनी केली आहे.
konkansamwad 
