देश महासत्ता बनविण्यासाठी विनोद तावडेंसारखे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत.....खासदार नारायण राणे यांच्याकडून विनोद तावडे यांची प्रशंसा

देश महासत्ता बनविण्यासाठी विनोद तावडेंसारखे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत.....खासदार नारायण राणे यांच्याकडून विनोद तावडे यांची प्रशंसा

कणकवली

 

     भाजपने पश्चिम बंगाल जिंकल्याचा मला अभिमान आहे. बंगालमध्ये भाजपला मोठ यश मिळवून देण्यात खासदार विनोद तावडे यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. देश महासत्ता बनविण्यासाठी विनोद तावडेंसारखे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत. श्री. तावडे यांनी बिहार नंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देत इतिहास घडवला,  असे गौरवद्गार खासदार नारायण राणे यांनी काढले. राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने प्रहार भवन येथे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार अजित गोगटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सतीश सावंत, लखमराजे भोसले, अशोक सावंत, संदीप साटम, मिलिंद मेस्त्री, श्याम काणेकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देण्यात विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिंधुदुर्गातील व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर जाऊन देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे नेतृत्व करत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे जिल्ह्याच्या विकासासाठी दर महिन्याला एकत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून पुढील पाच वर्षात विकासाची कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत. तावडे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते ती यशस्वीपणे पूर्ण करतात, असेही त्यांनी सांगितले. विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "माझ्या मातीत होणारा सत्कार म्हणजे गावकऱ्यांच्या शुभेच्छा आहेत. मंत्री होण्यापेक्षा महामंत्री म्हणून काम करण्यात मला अधिक आनंद मिळतो. राष्ट्रीय पातळीवर काम करताना अनेक अनुभव मिळत आहेत." तावडे म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचे ते फळ आहे. देशातील घुसखोरी रोखण्यासाठी बंगालमधील विजय महत्त्वाचा आहे."त्यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार करण्याची गरज व्यक्त केली. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "देशपातळीवर विनोद तावडे काम करताना दिसतात तेव्हा आमची कॉलर टाईट होते. त्यांच्या रूपाने देशाला एक सक्षम खासदार मिळाला आहे. तसेच प्रमोद जठार यांच्या रूपाने कोकणच्या विकासाला बुस्टर डोस मिळाला असून हा कोकणसाठी सुवर्णकाळ आहे."प्रमोद जठार यांनी आपल्या निवडीमागे नारायण राणे, नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचे योगदान असल्याचे सांगितले. दिल्लीमध्ये माझ्या नावासाठी विनोद तावडे यांनी वजन वापरले, त्यामुळेच मी आमदार झालो असे त्यांनी स्पष्ट केले.