ओरोस येथे औषधांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी

ओरोस येथे औषधांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी

सिंधुदुर्गनगरी
 

      औषधांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना भवानी सुपर मार्केट समोर मुंबई गोवा महामार्गावर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४८ एजी ७२४९ क्रमांकाचा टेम्पो मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जात होता. भवानी सुपरमार्केट परिसरात आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पोने महामार्गावरील लोखंडी कठडे आणि विजेचा खांब तोडून थेट सर्व्हिस रोडवर धडक घेतली. या जोरदार धडकेमुळे टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाला, ज्यामुळे काही काळ सर्व्हिस रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस आणि सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरील हा वळणाचा भाग आता अपघातप्रवण क्षेत्र बनत चालल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिसरात वाहनांचा वेग अनियंत्रित असतो, त्यातच वळणामुळे चालकांना अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. येथील वाढते अपघात पाहता, प्रशासनाने या ठिकाणी वेगमर्यादेचे फलक, रिफ्लेक्टर आणि इशारा देणारे दिवे तातडीने बसवावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.