दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्याच्या ग्रामीण राजकीय पटलावर आगामी पाच वर्षांसाठी महिलांचा व पुरुषांचा समसमान दबदबा राहणार आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी मंगळवारी जाहीर झालेल्या थेट सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत. तर उर्वरित १८ ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सरपंच किंवा महिला उमेदवारास पसंती दिल्यास त्याही ठिकाणी महिला सरपंच पहावयास मिळणार आहेत. ज्यामुळे अनेक गावांमध्ये उत्साहाचे तर काही ठिकाणी राजकीय समीकरणांची नव्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही आरक्षण सोडत संपन्न झाली. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, मंडळ अधिकारी शरद शिरसाट यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत करण्यात आली. ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सरपंच आरक्षण आज निश्चित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ (१) (२) नुसार तालुक्यातील सरपंच आरक्षण प्रक्रिया संपन्न झाली. कौस्तुभ केशव खांबल या विद्यार्थ्याने चिठ्ठ्या उचलून आरक्षण निश्चित केले. सोडतीवेळी राजकीय पदाधिकारी, गावातील संभाव्य उमेदवार व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. या सोडतीमुळे अनेकांना संधी गमवावी लागली आहे, तर अनेक गावांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे गावागावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे दिसून येते.