आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात; पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान.
रत्नागिरी.
आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, तयार आंबा काढण्यासाठी बागायतदारांची लगबग सुरू आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावत आहे. मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडावर असलेला आंबा जमिनीवर आला. ठिकठिकाणी झाडे, फांद्या तुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जमिनीवर आंब्याचा सडा पडला होता. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील १५ टक्के आंब्याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बागायतदारांकडून सध्या बाजारात १००० ते १८०० रुपये पेटीचा दर असून कॅनिंगला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे. पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील आंबा काढण्यात बागायतदारांना यश आले असले तरी शेवटच्या टप्प्यातील झाडावर असलेल्या १५ टक्के आंब्याचे नुकसान झाले आहे. यावर्षी नैसर्गिक संकटाचा परिणाम झाला तरी बागायतदारांनी कष्टाने आंबा पीक वाचवले. आंबा उत्पादन चांगले होते. परंतु दस गडगडल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात होते. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा येत्या आठ, दहा दिवसात तयार होईल यासाठी बागायतदार प्रतीक्षेत होते; मात्र मंगळवारी रात्री झालेल्या वारा व पावसामुळे आंबा जमिनीवर आल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बागेतील झाडे उन्मळून पडली झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यामुळे बागायतदारांचे दुहेरी नुकसान झाले आहे.