पिग्मी एजंट यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट
मालवण
पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या वरिष्ठ स्तरावरील आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत व्हावे या दृष्टीने न्याय मिळावा. असे निवेदन आमदार निलेश राणे यांना सुपूर्द केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर उपस्थित होते.राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये पिग्मी संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटांना कमाल 2.50 कमिशन देण्याच्या आदेशामुळे पिग्मी एजंट हवालदिल झाले आहेत. पिग्मी एजंट प्रशासन-शासन स्तरावर निवेदन देऊन आपली व्यथा मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पिग्मी एजंट यांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पिग्मी एजंट ऊन, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत ठेवीदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी, निवासस्थानी जाऊन पिग्मी स्वरूपात ठेवी गोळा करतात. पिग्मी एजंट ज्या पतसंस्थेसाठी पिग्मी संकलन करीत आहेत त्या संस्थेला एक आपलेच कुटुंब मानून सध्याच्या महागाईच्या काळातसुद्धा पूर्वीचे 3 टक्के कमिशन पुरेसे नसतानाही यामध्ये वाढ करण्याची मागणी कधीही केली नाही. सध्या इंधनाचे वाढत असलेले दर आणि महागाईच्या काळात या कमी केलेल्या तुटपुंज्या पिग्मी कमिशन मध्ये काम करणे अशक्य होणार आहे. खर्च आणि मिळकत यामध्ये ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे पूर्ववत पिग्मी कमिशनसाठी आपण पाठपुरावा करावा या मागणीसाठी आमदार निलेश राणे यांना निवेदन सादर केले.यावेळी आमदार निलेश राणे यांनी हा संपूर्ण राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय असून याबाबत योग्य ती माहिती घेऊन संबंधीत खात्याशी चर्चा केली जाईल. आपल्याला निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
konkansamwad 
