सिग्नल केले जॅम; जहाजे भरकटली
तेल अविव
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर केवळ 24 तासांतच मध्यपूर्वेतील समुद्री मार्गावर मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला. अनेक व्यापारी जहाजांच्या नेव्हिगेशन प्रणालींमध्ये बिघाड होऊन त्यांची लोकेशन चुकीची दाखवली जाऊ लागली. काही जहाजे स्वतःला विमानतळावर, अणुऊर्जा केंद्राजवळ किंवा इराणच्या भूभागावर असल्याचे दाखवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या गोंधळामागे जीपीएस सिग्नलचे 'जॅमिंग' आणि 'स्पूफिंग' हे तंत्र असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. युद्धाच्या परिस्थितीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मार्ग चुकवण्यासाठी लष्करांकडून जाणीवपूर्वक उच्च तीव्रतेचे रेडिओ सिग्नल प्रसारित केले जातात. त्यामुळे उपग्रह-आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये अडथळे निर्माण होतात. जॅमिंगमुळे सिग्नलच बंद पडतात, तर स्पूफिंगमुळे उपकरणांना चुकीचे स्थान दिसू लागते. 'विंडवर्ड' या शिपिंग इंटेलिजन्स कंपनीच्या अहवालानुसार, 28 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि इराणच्या समुद्री हद्दीत सुमारे 1,100 पेक्षा अधिक व्यापारी जहाजांच्या नेव्हिगेशन प्रणालींवर या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपाचा परिणाम झाला. जरी व्यापारी जहाजे थेट लक्ष्य नसली, तरी या हस्तक्षेपामुळे त्यांच्या मार्गदर्शन प्रणालींमध्ये गंभीर अडथळे निर्माण झाले.या तांत्रिक गोंधळाचा परिणाम विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील समुद्री वाहतुकीवर झाला. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि वायू निर्यात या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गातून होते. अचूक नेव्हिगेशन आवश्यक असलेल्या या मार्गावर जहाजांची हालचाल मंदावली असून, काही जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला किंवा सिग्नल बंद करून प्रवास करावा लागला. समुद्री विश्लेषक मिशेल वीजे बॉकमन यांनी सांगितले की, 'सध्या पर्शियन आखातात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती समुद्री नेव्हिगेशनसाठी अत्यंत धोकादायक आहे. एआयएस प्रणालीचा उद्देश जहाजांमधील टक्कर टाळणे हा असतो; पण जेव्हा जहाजांचे स्थान चुकीचे दाखवले जाते, तेव्हा मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होतो.अहवालानुसार, इराण युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या 24 तासांत जहाजांच्या एआयएस सिग्नलमध्ये अडथळे येणाऱ्या 21 नवीन क्षेत्रांची नोंद झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी ही संख्या 38 पर्यंत वाढली. 'लॉयडस् लिस्ट इंटेलिजन्स' या समुद्री डेटा कंपनीने 3 मार्चपर्यंत 655 जहाजांवर परिणाम करणाऱ्या 1,735 जीपीएस हस्तक्षेप घटनांची नोंद केली आहे.तज्ज्ञांच्या मते, जीएनएसएस सिग्नलमध्ये अडथळे निर्माण करण्याची ही पद्धत नवी नाही. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरही अशा प्रकारच्या तांत्रिक युद्धतंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. बाल्टिक समुद्र, काळा समुद्र आणि मध्यपूर्वेतील काही भागांमध्ये ही समस्या आता कायमस्वरूपी स्वरूप धारण करत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
konkansamwad 
