राज्यात आज पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी.

राज्यात आज पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी.

मुंबई.

     राज्यात आज विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीतही अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपच्या उमेदवारांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
   आज सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आजच्या मतदानासाठी पदवीधरांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासनाने विशेष सुट्टी मंजूर केली आहे. राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात महाविकास आघाडीने चांगली कामिगरी करत राज्यात जादा जागा मिळवल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात आता विधानपरिषद व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहिर झाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. तर हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे.
   त्यामुळे तो या निवडणुकीत देखील कसा ताब्यात ठेवता येईल या कडे ठाकरे गटापुचे लक्षआहे. तर भाजपने किरण शेलार यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक ही चुरशीची होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे व काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीतून महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार उभे आहेत. येथे पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकिडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.