देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासासाठी विनायक राऊत यांना पुन्हा लोकसभेत पाठवा : नितीन बानगुडे पाटील.

देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासासाठी विनायक राऊत यांना पुन्हा लोकसभेत पाठवा : नितीन बानगुडे पाटील.

देवगड.

     राष्ट्राचे रक्षण करणे हा महाराष्ट्र धर्म आहे. सगळ्या जाती, धर्मांना एकत्र घेऊन एकसंघ होणे हा महाराष्ट्र धर्म आहे. तोच महाराष्ट्र धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे.शिवसेना कोकणचा प्राण आहे.कोकण मुंबईचा प्राण आहे.मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. आपण राष्ट्राचा प्राण जपूयात. राऊत यांच्या विजयासाठी बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल हातात घेऊन विजयाची तुतारी फुंकूया. देशाच्या उज्वल भविष्यासाठी, कोकणच्या विकासासाठी राऊत यांना पुन्हा लोकसभेत पाठवूया, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी देवगड येथे केले.
   इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवगड शहरात शनिवारी सायंकाळी आयोजित प्रचार सभेत बानगुडे पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खासदार राऊत, आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत,अतुल रावराणे, मिलिंद साटम, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, राष्ट्रवादीच्या नयना आचरेकर, 'आप'चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, संदीप कदम, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी,अँड प्रसाद करंदीकर, सजाऊद्दीन सोलकर, युवक तालुकाध्यक्ष सुरज घाडी, हर्षा ठाकुर, सुगंधा साटम आदी उपस्थित होते.
      बानगुडे-पाटील म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान समर्पित केले.त्यामुळे लोकशाही समृद्ध, सामर्थ्यशाली झाली.आज देश हुकुमशाहीकडे जात आहे. ही निवडणूक गद्दारांविरुद्ध निष्ठावंतांची, हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे. संविधान वाचविण्यासाठी, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार, खासदार विनायक राऊत यांना विजयी करा, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
    इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले, सिडकोच्या माध्यमातून परप्रांतिय भूमाफियांच्या घश्यामध्ये कोकण भूमी घालण्याचे कपट कारस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. लाखो एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाला, तर विरोध करायचा नाही का? सिडकोच्या आक्रमणाला विरोध करायचा नाही का? यासाठी आमदार वैभव नाईक, राजन साळवी हे आपल्यासोबत उभे राहिले. कपट कारस्थानाने कोकण भूमी हडप करायला निघालात तर सिडकोच्या एकाही अधिकाऱ्याला कोकणच्या भूमीवर पाय ठेऊ देणार नाही, असे आम्ही महाराष्ट्राच्या महसूलमंत्र्यांना ठणकावून सांगितल्याचे राऊत म्हणाले.
   वैभव नाईक म्हणाले, नारायण राणेंनी गेल्या ३० वर्षात काय काम केले, हे विचारण्याचीसुद्धा वेळ आली आहे. आमदार नीतेश राणे हेदेखील टीका करण्याचेच काम करीत आहेत. देवगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे एकदिलाने काम करून विनायक राऊत यांना या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. सतीश सावंत, सुशांत नाईक, संदीप कदम, स्वप्नील धुरी, किरण टेंबुलकर, गणेश गावकर, अँड प्रसाद करंदीकर, सुशांत नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.