सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा....सावंतवाडी राजघराण्याने दिली ७० गुंठे जागा विनामोबदला
ठिकाण
सावंतवाडीकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जनहिताचा व्यापक दृष्टिकोन ठेवत सावंतवाडी संस्थानचे अधिपती श्री. खेम सावंत शिवराम सावंत भोंसले यांनी शहराच्या मोक्याच्या ठिकाणची तब्बल ७० गुंठे आणि करोडो रुपये किमतीची जागा महाराष्ट्र शासनाला विनामोबदला सुपूर्द केली आहे.या जागेच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. या दरम्यान सावंतवाडी राजघराण्याने वेळेत सर्व आवश्यक प्रतिज्ञापत्रे सादर करून न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य केले. केवळ जागा देऊन न थांबता, या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी श्री. खेम सावंत भोंसले आणि युवराज लखमराजे खेम सावंत भोंसले यांनी स्वखर्चाने वरिष्ठ शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे.सावंतवाडी संस्थानने समाजहिताला प्राधान्य देण्याची परंपरा कायम राखली आहे. यापूर्वीही संस्थानने सावंतवाडी गार्डन, शिल्पग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राणी जानकीबाई सुतिकागृह आणि नरेंद्र डोंगरावरील पाण्याच्या टाकीसाठी आपली मौल्यवान जमीन विनामोबदला दिली होती.भूतपूर्व अधिपती श्रीमंत शिवरामराजे खेम सावंत भोंसले यांनी सुरू केलेली ही सामाजिक बांधिलकीची परंपरा सध्याचे अधिपती श्री. खेम सावंत भोंसले, सौ. शुभदादेवी खेम सावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले हे तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत.दरम्यान, या प्रकरणात सकारात्मक भूमिका बजावल्याबद्दल कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठ, सर्व पक्षकार, वकील आणि शासकीय अधिकाऱ्यांचे सावंतवाडी राजघराण्याच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
konkansamwad 
