वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा मनसे वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी

वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा  मनसे वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी


वैभववाडी 
     यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त पाऊस  वैभववाडी तालुक्यामध्ये झाला असून गेले पंधरा दिवस वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीचे प्रत्यक्ष पंचनामे करून शासनाने वैभववाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम यांनी वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. या सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातशेती जमीनदोस्त होऊन पाण्यात कुजत आहे. तर बऱ्याच ठिकाणी भाताला कोंब फुटून आले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला जात आहे. त्यातच जंगली प्राण्याकडूनही मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे दुहेरी कात्रित शेतकरी सापडला आहे. आता खायचे काय व गुरांना वैरण कोणती घालायची असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ तुटुपुंजी नुकसान भरपाई नको तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली 
आहे.
   प्रत्येकवेळी फक्त पंचनामे केले जातात. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. आपण याप्रकरणी जातीनिशी लक्ष घालून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.