अंतिम प्रवासात माणुसकीचा आधार! कुडाळात लवकरच 'मोफत वैकुंठ रथ' सेवा सुरू
कुडाळ
मृत्यू हे जीवनाचे कटू सत्य आहे, मात्र दुःखाच्या या क्षणी मृतदेहाची ने-आण करण्यासाठी होणारी आर्थिक ओढाताण नातेवाईकांसाठी वेदनादायी ठरते. हीच बाब लक्षात घेऊन कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार सुधीर तेली यांच्या वतीने कुडाळ शहरात 'मोफत वैकुंठ रथ' सेवा सुरू करण्यात येत आहे. कुडाळचे प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम राबवण्यात येत असून, याचे लोकार्पण लवकरच आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह घरी किंवा स्मशानभूमीत नेण्यासाठी खाजगी वाहनांकडून मोठी रक्कम आकारली जाते. सर्वसामान्य कुटुंबांसाठी हे अवास्तव भाडे देणे अनेकदा कठीण होते. सामाजिक भावनेतून आणि माणुसकीच्या नात्याने कुडाळ शहर आणि संपूर्ण तालुक्यातील नागरिकांसाठी ही सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेली परिवाराने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या ८ वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून 'वातानुकुलित शवपेटी' मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. आता त्यात वैकुंठ रथाची भर पडल्याने कुडाळवासीयांची मोठी सोय होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडी येथे अशी सेवा उपलब्ध होती, मात्र कुडाळमध्ये तिची उणीव भासत होती. मृत व्यक्तीचा अंतिम प्रवास सन्मानाने व्हावा आणि गरिबांच्या खिशाला झळ सोसावी लागू नये, हाच या उपक्रम मागचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमामुळे कुडाळ तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, संकटाच्या काळात धावून येणाऱ्या या 'माणुसकीच्या रथाचे' सर्वत्र कौतुक होत आहे.
konkansamwad 
