दादर नामांतरावरून राजकीय वातावरण तापले

दादर नामांतरावरून राजकीय वातावरण तापले

मुंबई

 

     मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर 'चैत्यभूमी' करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर (मनसे) आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनीही या नामकरणाला उघडपणे विरोध दर्शवला आहे. "दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देऊ नये," अशी स्पष्ट भूमिका घेत सावंत यांनी सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नामांतराच्या मुद्द्यामागे राज्यकर्त्यांची राजकीय खेळी असून जनतेने तिला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आमच्या मनात चैत्यभूमीबद्दल नितांत आदर आहे, मात्र त्याचबरोबर 'दादर' या पारंपारिक नावालाही तितकेच आदराचे स्थान आहे. हे नामांतर सर्वसामान्य दादरकरांना रुचणारे नसून यावरून कोणताही राजकीय वाद निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा महेश सावंत यांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, मनसेचे यशवंत किल्लेदार यांनीही या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, या नामकरणाच्या प्रक्रियेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी १८ नोव्हेंबर रोजी सविस्तर माहिती दिली होती. दादर स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' करण्याच्या मागणीला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्र सरकारकडून आवश्यक मार्गदर्शन प्राप्त झाले असून, डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात याची सर्व औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर अधिकृतरीत्या स्थानकाचे नामांतर केले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. एकीकडे सरकारने नामांतराची अंतिम तयारी सुरू केलेली असतानाच, दुसरीकडे मनसे आणि ठाकरे गटाने एकत्रितपणे या निर्णयाला विरोध केल्यामुळे आगामी काळात मुंबईच्या राजकारणात या मुद्द्यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.