कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी शेडची सुविधा!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी शेडची सुविधा!

कणकवली



      कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  करण्यात आले. प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या शेडची मागणी केली जात होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.कोकण रेल्वे हे कोकणातील नागरिकांसाठी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांशी जोडणारे महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे विविध सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, रेल्वे प्रशासनाकडे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी शेड उभारण्याची मागणी फार जुनी होती. प्रवासी संघटनेचीही ही मागणी होती. आम्ही रेल्वे खात्याबरोबर सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश येऊन आज या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे आपल्या भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मुंबईसह राज्य आणि देशाशी जोडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे रेल्वेची वाट पाहताना प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी, या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.ते पुढे म्हणाले, शेडप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची मागणी करण्यात आली होती. लिफ्ट सुविधेच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले असून, लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात कणकवलीसह सिंधुदुर्ग आणि कोकणातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे.यावेळी मंडल रेल्वे मॅनेजर रत्नागिरी शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, गोकुळ सोनवणे (ए.एस.सी., रत्नागिरी), राजेश सुरवाडे (पीआय, आरपीएफ कणकवली), सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, अमोल रासम आणि सागर राणे आदी उपस्थित होते.