सिंधुदुर्गात जागतिक सायकल दिनानिमित्त 'संडेज ऑन सायकल' रॅली उत्साहात

सिंधुदुर्गात जागतिक सायकल दिनानिमित्त 'संडेज ऑन सायकल' रॅली उत्साहात

 

सिंधुदुर्गनगरी

 

     पंतप्रधानांच्या 'फिट इंडिया' संकल्पनेला प्रतिसाद देत आणि 'खेलो इंडिया'च्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग पोलीस आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून 'संडेज ऑन सायकल' या उपक्रमांतर्गत ही रॅली पार पडली.या रॅलीत जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांनी स्वतः खेळाडूंसोबत सायकल चालवत या रॅलीत सहभाग घेतला. त्यांच्या या सहभागामुळे तरुण पिढीला आरोग्य आणि स्वास्थ्याची जपणूक करण्याचा एक उत्तम संदेश मिळाला. ही सायकल रॅली कुडाळ पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन एस. एन. देसाई चौक आणि पानदूर मार्गे पुन्हा कुडाळ पोलीस ठाणे अशी काढण्यात आली होती.या उपक्रमाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती, ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती श्वेता खाडे, कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनःशाम आढाव, तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अतुल जाधव आणि अमोल चव्हाण यांचा समावेश होता. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील तब्बल ७० सायकलस्वारांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, क्रीडा विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीमुळे रॅलीत मोठे चैतन्य निर्माण झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.