मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन; क्रिकेट विश्वाला मोठा धक्का.

मुंबई.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. सध्या सुरू असलेल्या टी ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट करंडकाचे सामने पाहण्यासाठी ते अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मित्रांसमवेत गेले होते. रविवारी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा त्यांनी आनंद घेतला. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. काही क्षणांत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
अमोल काळे हे मूळ नागपूरचे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिशनच्या निवडणुकीत त्यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळविले होते. एमसीएच्या कारभाराचे नेतृत्व करण्याबरोबरच, काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगसोबत या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या टेनिस-बॉल फ्रँचायझी क्रिकेट लीगचे सह-प्रवर्तक देखील होते.
भारतीय क्रिकेट संघाला अनेक दर्जेदार खेळाडू पुरविण्याची खाण असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी यश मिळविले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते आशिष शेलार या सगळ्या दिग्गजांचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता. त्यांच्या समोर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान होते. ते आव्हान त्यांनी शरद पवार यांची मुत्सदेगिरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीच्या जोरावर यशस्वीरित्या परतावून लागले.
महान क्रिकेटपटूंबद्दल काळे यांचा आदर होता. 10 जुलै रोजी सुनील गावस्कर यांचा 75 वा वाढदिवस एमसीएने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यासह साजरा करण्याची योजना सुरू होती. अमोल काळे यांचे मुंबई क्रिकेटमधील योगदान आणि खेळाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील. अमोल काळे यांच्या जाण्याने मुंबई क्रिकेट असोशिएशन तसेच मुंबईतील क्रीडा विश्व आणि क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे सहकारी, निकटवर्तीय आणि राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात आले. त्यांच्या जाण्याने एमसीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.